नाशिक : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना वार्षिक भाडेकरार रद्द करून तातडीने नवीन निविदा प्रक्रिया करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंगळवारी (ता. २६) मंत्रालय स्तरावर वसंतदादा पाटील कारखान्याच्या प्रश्नावर बैठक झाली. यावेळी राज्य सहकारी बँकेला याविषयी तातडीने कार्यवाहीचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष पंडितराव निकम, निमंत्रक सुनील देवरे, उमराणे बाजार समितीचे माजी अध्यक्ष विलास देवरे, कामगार युनियनचे संस्थापक अरुण सोनवणे यांच्यासह राज्य सहकारी बँक व सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी महाराष्ट्र सहकारी कायदा अधिनियम २००२ / च्या कलम १३ (ब) नुसार, थकीत कर्ज वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त केली असली, तरी ती बँकेची अंतिम मालमत्ता नाही. वार्षिक भाडेकरार करताना परस्पर करार झाला आहे. याबाबत कार्यक्षेत्रात तीव्र नाराजी आहे. ज्यांना भाड्याने कारखाना दिला, त्या धाराशिव साखर उद्योगाने विश्वास संपादन केला नसल्याचे सांगितले. तर सुनील देवरे, पंडितराव निकम यांनी कारखान्याच्या करारातील अटी- शर्तींचा भंग झाल्याने करार रद्द करावा, सभासदांचे प्राधिकृत मंडळ नियुक्त करावे, अशी मागणी केली. राज्य सहकारी बँक प्रशासनाने याविषयी अटी-शर्ती न पाळण्यात आल्याने नोटीस दिल्याचे स्पष्ट केले. धाराशिव साखर उद्योगाने २९ ऑगस्टला कारखाना चालविण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट केल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे तूर्त प्राधिकृत मंडळ नियुक्त करावे अशी मागणी करण्यात आली.