पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय मतभेद दूर ठेवून शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी घोडगंगा साखर कारखान्याचे कामगार नेते महादेव मचाले यांनी पत्रकार परिषदेत केली. कारखाना बंद असून, कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी चालू वर्षी घोडगंगा कारखाना सुरू न झाल्याने, कामगारांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे असे मचाले यांनी सांगितले.
कारखाना चालू वर्षी आर्थिक अडचणीत आहे. एकही दिवस गाळप न झाल्याने कारखाना पूर्णपणे बंद पडला असून त्याचे खापर कामगारांवर फोडले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक पवार यांच्याशी असलेले मतभेद बाजूला ठेवून कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. कामगार संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब मासाळ, मारुती नागवडे, अनिल शेलार, शिवाजी कोहोकडे, कांतीलाल साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.