कोल्हापूर : संपूर्ण बहुमत पाठीशी असताना भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांनी चेअरमन पदाचा त्याग करून वेगळा आदर्श निर्माण केला. कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. हसुर दुमाला येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप व जनता दल आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार पी. एन. पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी जि. प. अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर, क्रांतिसिह पवार-पाटील, अशोकराव पवार-पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, राजेश पाटील-सडोलीकर, पी. डी. धुंदरे, कृष्णराव किरुळकर, बी. के. डोंगळे आदी उपस्थित होते.
ए. वाय. पाटील म्हणाले की, कारखाना अडचणीतून बाहेर काढण्याची धमक आमदार पाटील यांच्या अंगी आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण आघाडी करून सभासदांना सामोरे जात आहोत. मी व आमदार पाटील यांनी ज्यांना चेअरमनपद दिले, त्यांनी कारखाना आर्थिक अरिष्ठात ढकलला. मात्र, आमदार पाटील यांनी सलग सहा वर्षे आर्थिक अडचणीत असलेला कारखाना मार्गावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.
ए. वाय. पाटील म्हणाले की, विरोधी आघाडी करणाऱ्या मंडळींनी खासगी मालकाकडे चालवायला दिलेला डिस्टलरी प्रकल्प कारखान्याच्या मालकीचा केला आहे. आगामी काळात त्यातून उत्पादन सुरू होणार आहे. त्यामुळे ‘भोगावती’ला केवळ आमदार पी. एन. पाटील हेच वाचवू शकतील. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व गोकुळचे संचालक किसन चौगुले यांनी भोगावती साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा यासाठीच आम्ही आघाडी केलेली आहे.