छत्रपति संभाजीनगर : फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना हा सरकारच्या तिजोरीतून पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमुक्त करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील वडोद बाजार येथे महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेत शनिवारी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, ‘राजे संभाजी’ आणि रामेश्वर साखर कारखाना सुरू ठेवण्यासाठी या भागाच्या आमदार व खासदारांनी देवगिरी सहकारी साखर कारखान्याचा बळी दिला. आतापर्यंत दहा वर्षे भाजपची राज्यात आणि केंद्रात सत्ता होती. मग आतापर्यंत देवगिरी कारखाना का सुरू केला नाही. बागडे अन् दानवेंनी कारखाना सुरू करण्याचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर न्यायालयात द्यावे अन्यथा महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना निवडून आणा, आम्ही कारखाना सुरू करण्याचे हमीपत्र न्यायालयात देतो.