कर्नाल : उत्तर – पश्चिम क्षेत्राकडील राज्यांतील शेतीमध्ये पाणी साचण्याच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या भागात ऊसाच्या विविध प्रजातीच्या परीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. जास्त पाऊस, पूर अथवा लवकर शेतातील पाणी न घटण्याच्या स्थितीशी सामना करू शकणाऱ्या प्रजाती निश्चित केल्या जातील. भविष्यात अशा विभागांसाठी संशोधक नव्या प्रजातीचे ऊसाचे बियाणे विकसित करतील. या संशोधनातून पाणी साचण्याची समस्या असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान वाचविले जाईल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुदृढ होईल.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पहिल्या टप्प्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोईंबतूर ऊस संशोधन संस्थेच्यावतीने २० प्रजाती आणि कर्नालमधील ऊस संशोधन केंद्राच्यावतीने १८ प्रजातींचे परीक्षण उत्तर प्रदेशातील विविध साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात याची चाचणी सुरू आहे. तर बिहारमधील पाणी साठणाऱ्या विभागांमध्ये ऑक्टोबर २०२२ पासून परीक्षण सुरू केले जाणार आहे. ऊस संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा मुख्य संशोधक डॉ. एस. के. पांडे यांनी सांगितले की, गोरखपूरमधील रामकोला विभागात ७० टक्क्यांपर्यंत पाणी साठण्याची समस्या आहे. बलरामपूर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात परिक्षणासाठी करार करण्यात आला आहे. या ठिकाणी ३८ प्रजातींचे वाण लावून चाचणी घेण्यात येईल. त्यावर पाणी साठण्याचा कितपत परिणाम होतो हे तपासले जाईल. सद्यस्थितीत सीओ ०२३८ प्रजातीचा ऊस १५ दिवसांपर्यंत पाण्याचा दाब सहन करू शकतो. बिहार आणि उत्तर प्रदेशातील अनेक भागात वेगवेगळा जलस्तर असतो. यासाठी तेथे लावण्यात येणाऱ्या उसाच्या प्रजातींचे परीक्षण सुरू आहे. पुढील तीन वर्षात त्याचे निष्कर्ष मिळतील असे कर्नाल ऊस संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. एस. के. पांडे यांनी सांगितले.