धाराशिव : भैरवनाथ शुगर कारखान्याच्या माध्यमातून परंडा तालुक्याच्या विकासात भर पडली आहे. परिसरावरील गेटकेनचा शिक्का पुसला व उस उत्पादक शेतकरी सुखावला आहे, असे मत भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक तथा जि.प. माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी व्यक्त केले. ज्यांना स्वतःचा कारखाना अनेक वर्ष चालू करता आला नाही, त्यांनी कारखान्यावर बोलणे म्हणजे बालीशपणा आहे, अशी टीका सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर केली.
मोटे यांनी परंडा येथे पत्रकार परिषद घेवून पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यावर टीका केला होती. त्या अनुषंगाने जि.प. माजी उपाध्यक्ष सावंत यांनी मंगळवारी (दि.२२) पत्रकार परिषद घेवून प्रत्युत्तर दिले. सावंत यांनी भैरवनाथ साखर कारखाना उभा करत असताना माजी आ. मोटे यांनी विरोध केल्याचा आरोपही केला. बाणगंगा कारखाना चालवता न येणाऱ्यांनी भैरवनाथ कारखान्यावर बोलू नये. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके म्हणाले, शिवजल क्रांती, स्वच्छता मोहीम विविध समाजोपयोगी कार्यक्रम मंत्री तानाजी सावंत यांनी स्वखर्चातून राबवले आहेत.