धाराशिव : जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी २० जानेवारीअखेर १९ लाख ४८ हजार टन ऊस गाळप केले असून १२ लाख ६३ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. आतापर्यंतचा सरासरी साखर उतारा ६.४९ टक्के आला आहे. यामध्ये रांजणीच्या ‘नॅचरल शुगर’ने भरारी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक ३,४३,०६० टन उसाचे गाळप केले असून ३,०४,२०० क्विंटल साखर उत्पादित करून आघाडी मिळविलेली आहे. मंगरूळच्या कंचेश्वर कारखान्याने १,८०,६८० टन ऊस गाळप करून उच्चांकी १,९६,५०० क्विंटल साखर उत्पादित करत सर्वाधिक ११ टक्के साखर उतारा मिळविला आहे.
जिल्ह्यातील एकूण १२ साखर कारखान्यांपैकी पाच सहकारी कारखान्यांनी आठ लाख ४७ हजार ३८३ टन उसाचे गाळप करून पाच लाख ३९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उतारा ६.३६ टक्के आहे. तर खासगी सात कारखान्यांनी ११ लाख ६४९ टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. या कारखान्यांनी ७ लाख २४ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. चोराखळीतील धाराशिव कारखान्याने ८३ हजार ६६० टन ऊस गाळप करीत ६६ हजार ५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सोनारीतील भैरवनाथ शुगरने एक लाख १७ हजार टन ऊस गाळप करून ६० हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. खेडच्या लोकमंगल माउली कारखान्याने ८६ हजार ७५० टन उसाचे गाळप करीत ५७ हजार ७२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.