धाराशिव : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत १२ साखर कारखान्यांनी २७,१२,५९४ टन उसाचे गाळप करून १८,१८,००० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरेचा सरासरी उतारा केवळ ६.७ टक्के आहे. सद्यस्थितीत गळीत हंगामात सहभागी कारखान्यांपैकी ढोकी येथील तेरणा, तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ आणि धाराशिव तालुक्यातील अरविंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन कारखाने ऊस संपल्याने बंद झाले आहेत. तर कळंब तालुक्यातील नॅचरल शुगर कारखान्याचे गाळपही लवकरच संपेल. फेब्रुवारीअखेर जिल्ह्यातील गाळप हंगाम संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील बारापैकी ५ सहकारी कारखान्यांनी ११,१५,२०१ टन उसाचे गाळप करीत ७,०४,३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे आणि त्यांचा साखर उतारा ६.३२ टक्के आहे. सात खासगी कारखान्यांनी १५,९७,३८० टन उसाचे गाळप करून ११,१३,६५६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखरेचा सरासरी उतारा ६.९७ टक्के आहे. जिल्ह्यात गाळप, साखर उत्पादन आणि उतारा या तिन्हीबाबतीत रांजणीच्या ‘नॅचरल शुगर’ने मोठी आघाडी घेतली आहे. कारखान्याने ४,६३,६०० टन उसाचे गाळप करून ४,२८,६५० क्विंटल साखर उत्पादित केली. या कारखान्याचा उतारा ९.३९ टक्के आहे. तर वाशी तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याने सर्वात कमी म्हणजे ६९,८१० टन ऊस गाळप करून ६०,१०६ क्विंटल साखर उत्पादित केली आहे.