धाराशिव : येथील नॅचरल शुगरने यावर्षी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. कारखान्याने राज्यातील सर्वोत्कृष्ट डिस्टिलरी, तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे एकूण तीन पुरस्कार पटकावले आहेत. व्हीएसआयचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हस्ते मांजरी येथे इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गुरुवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दरम्यान, या सर्व पुरस्काराचे खरे मानकरी नॅचरल परिवाराचे सर्व घटक आहेत. शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार, कामगार व अधिकारी यांचेच हे यश आहे. त्यामुळे पुरस्कार कर्मचाऱ्यांना समर्पित करतो, असे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
नॅचरल शुगरने गेल्या आर्थिक वर्षात आसवनी विभागात दैनंदिन उत्पादन क्षमता, सरासरी क्षमता वापर, फर्मेंटेड वॉशमधील अल्कोहोलचे प्रमाण, किन्वन प्रक्रियेची कार्यक्षमता, मागील तीन वर्षात बी-हेवी मोलासेस व सिरपपासून इथेनॉल निर्मितीत उत्कृष्ट कार्य केल्याने एक लाख रुपयांचा रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार मिळाला. तांत्रिक विभागाने चांगले गाळप करून बगॅस बचत, साखरेचे उत्पादन चांगले घेतल्याने उत्तर पूर्व विभागाचा तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार मिळाला. वित्त विभागाने सरासरी साखरेचा उत्पादन खर्च राज्यामध्ये सर्वात कमी राखत सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार पटकावला. नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष, कृषीरत्न बी. बी. ठोंबरे, संचालक, अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संचालक पांडूरंग आवाड, बालाजी तट, संभाजी रेड्डी, किशोर डाळे, जनरल मॅनेजर यू. डी. दिवेकर, वर्क्स मॅनेजर एस. व्ही. पाटील, फायनान्स मॅनेजर एस. व्ही. निगुट, डिस्टिलरी मॅनेजर ए. जी. शिंदे, अधीक्षक एस. ए. साळुंके आदी उपस्थित होते.