धाराशीव : यंदा पाण्याचे स्रोत बंद पडल्याने तालुक्यातील ५० टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्रातील ऊस पिक मोडीत काढले आहेत. पावसाचे प्रमाण घटल्याने यंदा अवर्षणस्थितीमुळे शेत शिवारातीत पीकाची स्थिती नाजुक झाली आहे. तालुक्यात कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. जवळपास ३२ सिंचन प्रकल्पाची निर्मिती झाली आहे. मात्र, अलिकडे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाण्याची स्थिती नाजुकच झाली आहे. यंदा तर हिवाळ्यातच प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला होता. फेब्रूवारी महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची दाहकता सुरु झाली आहे.
यंदा पाण्याअभावी उसाचे क्षेत्र निम्याहून अधिक घटले. पाणी पातळी खोलवर गेल्याने ओलिताखालील पीके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. तालुक्यातील बलसुर येथील जयराज पटवारी यांच्या शेतातील २७ कुपनलिकांपैकी २६ कुपनलिकेचे पाणी बंद झाले आहे तर पाचही विहिरी कोरड्या पडल्याने जवळपास ४० एकर ऊसाचे क्षेत्र यंदा पहिल्यांदाच मोडीत काढावे लागले आहे. ठिबक पद्धतीच्या पाणी वापरातून जवळपास ६० टक्के पाण्याची बचत होते. शेतकऱ्यांसाठी टंचाईच्या काळात ही चांगली पर्वणी आहे असे मंडळ कृषि अधिकारी ए. बी. पटवारी यांनी सांगितले.