धाराशिव : मजुरांअभावी मोजकीच गुऱ्हाळघरे सुरू; गुणवत्तापूर्ण ऊस नसल्याने उत्पादनात घट
धाराशिव : उमरगा-लोहारा तालुक्यात यंदा तीन कारखाने सुरू आहेत. उसाचे क्षेत्र बऱ्यापैकी असल्यामुळे यंदा उसाची पळवापळवी नसली तरी चांगल्या प्रतीच्या उसाची उपलब्धता नसल्यामुळे साखर उतारा व गूळ उत्पादनावर परिणाम झाला आहे. ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मागील पाच-सहा वर्षात गुऱ्हाळ केंद्र कमी झाले. मजुरांची कमतरता, मजुरीचे वाढलेले दर, क्षेत्र वाढूनही गुळाला येणारा कमी उतारा आदींमुळे तालुक्यात मोजक्याच ठिकाणी गुन्हाळ केंद्र सुरू आहेत.
तालुक्यात मुरूम विठ्ठलसाई साखर कारखाना, समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार साखर कारखाना, खेड येथील लोकमंगल साखर कारखान्याला ऊस मोठ्या प्रमाणात जात आहे. ऊस कारखान्यास जाणे शक्य नसल्याने शेतकरी सोयीसाठी व चार पैसे अधिक मिळवण्यासाठी गूळ निर्मितीला प्राधान्य देतात. एका नांदीसाठी सव्वा टन ऊस लागत असे. पण यंदा उसाची परिपक्वता अधिक नसल्याने दीड टन ऊस लागतो. त्यातून किमान दोन (१८ ते २२ डाग) क्विंटल गूळ तयार होतो. मात्र, यंदा उसाची परिपक्वता कमी असल्याने दीड ते पावणेदोन टन गुळाचे उत्पन्न मिळत आहे. एका नांदीसाठी मजुरीचे दर दोन हजारांपर्यंत आहेत.
बदलत्या परिस्थितीनुसार उत्पन्न आणि दराचा मेळ बसावा लागतो. यंदा अतिवृष्टीने १६-१७ कांडी उसाऐवजी १४ कांडी ऊस अधिक आहे. क्षेत्र वाढले असले तरी उसाची परिपक्वता फारशी नाही. परिणामी एका नांदीला मिळणारा उतारा कमी मिळत आहे. दर स्थिर असले तरी उतारा कमी आहे. त्यात मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना अधिकचा फायदा मिळत नसल्याचे गूळ उत्पादक विवेक जाधव यांनी सांगितले.
बाजारपेठेत गुळाला ३५०० ते ३९०० रुपयांपर्यंत दर आहे. नांदीला १७ हुन अधिक डाग तयार होतात. पाच किलोचे डाग तयार केल्यास उत्तम प्रतीच्या गुळाला ४ हजार रुपयांहून अधिक भाव मिळतो. गूळप्रक्रियेतून मिळणारे उत्पन्न फायद्याचे असले तरी गुळाचा दर स्थिर नसल्याने कमी-अधिक प्रमाणात फायदा होतो. रसायनमिश्रित चकाकी असलेल्या गुळाला बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असून रासायनिक प्रक्रिया न केलेल्या गुळाला अधिक मागणी असल्याचे सांगितले.
बाजारपेठेत मकरसंक्रातीच्या पूर्वी गुळाला ४ हजार रुपये प्रति क्विंटल दर होता. आता तो दर ३५०० पासून ३९०० रुपयांपर्यंत आहे. हा दर शेतकऱ्यांना फायदा देणारा असला तरी उत्पन्नात घट होत असल्याने गूळ निर्मितीसाठी येणारा खर्च व मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळत नाही. रासायनिक प्रक्रिया न केलेला सेंद्रिय गूळ आरोग्यास उत्तम असल्याने त्याची मागणी वाढली आहे.