धाराशिव : अपुऱ्या मनुष्यबळाचा जिल्ह्यातील ऊस तोडणीवर परिणाम

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील यंदाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपूर्वी सुरू होणे गरजेचे होते. मात्र, यास काही कारणाने काहीअंशी विलंब लागला. त्याचा फटका ऊस तोडणीला बसला आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत निम्मी ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध झाली आहे. यामुळे अनेक कारखान्यांमध्ये काही दिवस ‘नो केन’ अशी स्थिती असते. व्यवस्थापन खर्च, घसारा, गाळप खर्च तोच, मात्र गाळप कमी असे झाल्यास कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान होते, असे कारखानदारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कळंब तालुक्यातील साखर कारखानदारी समोरही बिकट समस्या उद्भवली आहे. हंगामाची सुरुवात होण्यास उशीर झाल्याने ऊसतोड कामगारांच्या टोळ्यांनी कर्नाटकला जाण्यास पसंती दिली. त्यामुळे ही स्थिती ओढवली असल्याचे सूत्रांकडून समजते. कळंब तालुक्यात मागच्या दोन दशकांत ऊस गाळप करणाऱ्या उद्योगांनी आपला चांगलाच जम बसवला आहे. एकाच तालुक्यात तीन खासगी साखर व चार गूळ पावडर निर्मिती करणारे कारखाने उभे राहिले आहेत. यात हावरगाव येथे डीडीएन एसएफए युनिट दोन, रांजणी येथे नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज, चोराखळी येथे धाराशिव शुगर हे तीन खासगी साखर कारखाने तर मोहा येथे मोहेकर अॅग्रो, वाठवडा शिवारात डीडीएन वन, खामसवाडी येथे सिद्धीविनायक अॅग्रीटेक हे गूळ पावडर कारखाने कार्यान्वित झाल्यानंतर गाळप करत आले आहेत. यंदा मात्र तोड यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे कारखानदारांसमोर मनुष्यबळाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here