धाराशिव : देशभरात खांडसरी साखर उद्योगामुळे हजारो शेतकऱ्यांचा साखर कारखान्याने न गाळप केलेला ऊस गाळप केला जातो. तसेच ग्रामीण भागातील युवकांना यामुळे रोजगार मिळत आहे. शेतकऱ्यांना देखील या उद्योगाचा फायदा होत आहे. प्रस्तावित कायद्यामुळे खांडसरी व गुळ पावडर उद्योग संकटात येणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील इजमा या गुळ पावडर संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारच्या प्रस्तावित नवीन साखर नियंत्रण कायद्यातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी केंद्र सरकार प्रस्तावित नवीन साखर नियंत्रण कायद्यातील जाचक अटी रद्द करून साखर व गुळ पावडर उद्योगास दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेने केली. गूळ, खांडसरी उद्योगावर अन्याय होवू नये याची काळजी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.