धाराशिव : चांगला दर आणि अनुकूल परिस्थितीमुळे ऊस पीक केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर आता मराठवाड्यातही ऊस क्षेत्र वाढले होते. परंतु यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने शेतकरी उसाचे पीक मोडीत काढत आहेत. उसाच्या क्षेत्रावर शेतकरी सोयाबीन पिकाचा पेरा करण्यासाठी लगबग करताना पाहावयास मिळत आहेत. सोयाबीनचा दर वर्षभर दबावात असूनही दुसरा सक्षम पर्याय नसल्याने त्याकडे शेतकरी वळले आहेत.
मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर ४ हजार ६०० रुपयावर स्थिर आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असताना आता सोयाबीनची लागवड पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने अजूनही सोयाबीन विकले नाही. बाजारात भाव नाही आणि आवकही नाही अशी अवस्था सध्या सोयाबीन पिकांची झाली आहे. पाण्याअभावी उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे अल्प दर असतानाही शेतकऱ्यांचा सोयाबीनच्या पेऱ्याकडे कल वाढला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा पसरवणारा ऊस पाण्याअभावी व निसर्गाच्या लहरीपणामुळे मोडला जात आहे.