धाराशिव : जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात २७ फेब्रुवारीअखेर २८ लाख ९ हजार २३ टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून १९ लाख ९ हजार २८५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखरेचा सरासरी उतारा केवळ ६.८ टक्के आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस गाळपात २३ लाख टनांची घट झाली असून साखर उत्पादनातही तब्बल २८ लाख क्विंटलने घटले आहे. साखर उतारा २.४ टक्क्यांनी घसरला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १२ पैकी ८ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. यामध्ये तेरणा, भैरवनाथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नॅचरल शुगर, कंचेश्वर, लोकमंगल, बाणगंगा, भाऊसाहेब बिराजदार या कारखान्यांचा समावेश आहे. उर्वरित चार कारखानेही लवकरच बंद होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील ऊस गाळपाला मागील वर्षीच्या दुष्काळजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. गेल्यावर्षी १५ मार्चअखेर जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ५१,३८,९३७ टन उसाचे गाळप केले होते. त्यापोटी ४७,२६,२४० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते. गेल्यावर्षी सरासरी साखर उतारा ९.२ टक्के होता. यंदा पाच सहकारी कारखान्यांनी ११,४७,१५४ टन उसाचे गाळप करत ७,२७,००० क्विंटल उत्पादन घेतले. सहकारी कारखान्यांचा साखर उतारा ६.३४ टक्के आहे. सात खासगी कारखान्यांनी १६,६१,८६९ टन उसाचे गाळप करून ११,८२, २८५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून साखर उतारा ७.११ टक्के आहे. सद्यस्थितीत रांजणीच्या नॅचरल शुगरने ऊस गाळप, साखर उत्पादनात वर्चस्व राखले आहे. तर मंगळुरूच्या ‘कंचेश्वर’ने मिळविला ११.१६ टक्के उच्चांकी उतारा मिळवला आहे. नॅचरल शुगर्सचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार, गाळप, साखर उत्पादन व उतारा घटण्यास गेल्या वर्षीची दुष्काळी स्थिती कारणीभूत आहे.