धाराशिव : कळंब तालुक्यातील साखर कारखानदारांसमोर यंदा ऊस तोडणी यंत्रणेतील अपु्ऱ्या मनुष्यबळामुळे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हंगाम उशिरा सुरु झाल्याने दरवर्षी येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या कर्नाटकात निघून गेल्या. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत निम्म्याच टोळ्या मिळाल्या आहेत. यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे कारखानदारांसमोर मनुष्यबळाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. जिल्ह्यातील यंदाचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपूर्वी सुरु होणे गरजेचे होते. मात्र, यास काही कारणाने विलंब लागला. त्यामुळे तालुक्यातील सर्वच ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांना वेळेत ऊस तोडणी कशी करायची हा प्रश्न पडला आहे.
कळंब तालुक्यात तीन खासगी साखर कारखाने आणि चार गूळ पावडर निर्मिती करणारे कारखाने उभे राहिले आहेत. यात हावरगाव येथे डीडीएन एसएफए युनिट दोन, रांजणी येथे नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज, चोराखळी येथे धाराशिव शुगर हे तीन खासगी साखर कारखाने तर मोहा येथे मोहेकर ॲग्रो, वाठवडा शिवारात डीडीएन वन, खामसवाडी येथे सिद्धीविनायक अॅग्रीटेक या गुळ पावडर कारखान्यांचा समावेश आहे. यंदा धाराशिव येथील सुधीर पाटील यांनी ऊस गाळप उद्योगात आपल्या ‘हातलाई उद्योग समूहाचे पाऊल टाकले आहे. तालुक्यातील जवळा खुर्द शिवरात २ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या कारखान्याची उभारणी केली आहे. नुकताच याचा प्रथम गाळप हंगाम सुरू झाला आहे. नॅचरल शुगरने ३० डिसेंबरअखेर सर्वाधिक २ लाख ३३ हजार मेट्रीक टन गाळप केले. धाराशिव शुगरने ४८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. हावरगाव येथील डीडीएन कारखाना मात्र बंद आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.