धाराशिव : कळंब तालुक्याने देशाच्या साखर अन् गूळ उद्योगात मानाचे स्थान निर्माण केले आहे. तालुक्यात तब्बल सात ऊस गाळप करणारे कारखाने उभे राहिले आहेत. जिल्ह्याच्या तुलनेत एकूण गाळप, साखर उत्पादन यामध्ये एकट्या कळंबचा वाटा २५ टक्क्यांहून अधिक आहे. दररोज २० हजार मेट्रिक टन एवढ्या विक्रमी ऊस गाळपाची तालुक्यात क्षमता स्थापित झाली आहे. एकूणच एकाच तालुक्यात तीन साखर व चार गूळ पावडर कारखाने असलेला कळंब हा एकमेव तालुका ठरतोय. यामुळेच या क्षेत्रात आता कळंबचे नाव मोठ्या अदबीने घेतले जात आहे.
सन २००० मध्ये कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी रांजणी येथे नॅचरल शुगर सुरू केला. यानंतर हावरगाव येथे शंभू महादेव- डीडीएन, चोराखळी येथील धाराशिव साखर (पंढरपूर येथील डीव्हीपी उद्योग समूह) सुरू झाला. वाठवडा येथे डीडीएन, मोहा येथे मोहेकर अॅग्रो, खामसवाडीत सिद्धिविनायक हे गूळ पावडर कारखाने उभा राहिले. याशिवाय सुधीर पाटील यांच्या मंगरूळ शिवारातील सातवा कारखाना गाळपाच्या तयारीत आहे. तालुक्यात मागच्या अडीच दशकांत ऊस गाळप करणाऱ्या साखर व गूळ निर्मिती उद्योगांनी मोठी क्रांती करून अर्थकारणाला मोठा हातभार लावला आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात एकूण सात साखर कारखाने आहेत. तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल परिवाराने तब्बल दोन हजारांहून अधिक लोकांना थेट रोजगार दिला आहे. यात तालुक्यातील दीड हजारांवर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. धाराशिव व डीडीएन शुगरनेही प्रत्येकी तीनशेपेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.