धाराशिव: यंदा उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने कारखानदारांना जादा दराचे आमिष द्यावे लागत आहे. जादा दराचे आमिष दाखवून उसाची पळवापळवीची शक्यता आहे. उसाची कमतरता असल्याने गाळप हंगाम ६० ते ७० दिवसांचा असणार आहे. जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांनी गाळपास सुरुवात केली. मागील वर्षीचा अनुभव पाहता यंदा साखर कारखान्यांकडून प्रती टन २८०० ते ३ हजार रुपयांपर्यंत दराची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. यंदा त्याउलट स्थिती आहे. समुद्राळ येथील भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने मागील हंगामात सर्वाधिक २८०० रुपये दर दिला होता. कंचेश्वर कारखान्या २७०० तर नॅचरल शुगरने पहिला हप्ता २५०० रुपयांचा दर जाहीर केला. माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी इतर कारखान्यांपेक्षा ५० रुपये अधिक देण्याची घोषणा केली आहे. याबाबत नॅचरल शुगरचे अध्यक्ष डॉ. बी. बी. ठोंबरे म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या उसाला दरवर्षी समाधानकारक दर देतो. यावर्षी अधिक दराने ऊस खरेदी करण्याचे धोरण नाही. मात्र, उसाच्या रिकव्हरीप्रमाणे दर देण्याचे आम्ही निश्चित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊन कारखान्यालाही याचा फायदा होणार आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.