धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांकडे ऊस पुरवठा केलेला आहे. साखर कारखाने बंद होऊन पंधरा दिवसाचा कालावधी लोटला आहे. एवढा कालावधी जाऊनही जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची उसाची पहिली उचल अद्याप दिलेली नाही. येत्या चार दिवसात ऊसाची पहिली उचल साखर कारखान्यांनी देण्यासाठी कारखान्यांना आदेश देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी साखर आयुक्तांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. कारखान्यांनी लवकर बिले न दिल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. पुणे साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, अनेक कारखान्यांनी १५ जानेवारीनंतर ऊसाची पहिली उचल दिलेली नाही. त्यामुळे येत्या चार दिवसात ऊसाची पहिली उचल साखर कारखान्यांनी देण्यासंदर्भात आपण आदेश द्यावेत. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल.