धाराशिव : ऊस तोडणीसाठी सर्वात कमी खर्च करणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात कारखान्याने ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चापोटी प्रती टन केवळ ५४९ रूपये ८० पैसे एवढी खर्चकपात केली.गेल्यावर्षी खर्च करण्यात आलेल्या ऊसतोडणी व वाहतूक खर्च कपातीची माहिती साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत कुलकुंडवार यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. राज्यातील सहकारी, खासगी कारखान्यांचे कारखानानिहाय खर्चकपातीची रक्कमच साखर आयुक्तांनी घोषित केली आहे. या अग्रस्थानी असलेल्या साखर कारखान्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे.
सर्वात कमी ऊस तोडणी व वाहतूक खर्च करणारे कारखान्यांमध्ये अहदमनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी सा. कारखान दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारखान्याने प्रतीटन ६२१.२५ खर्च कपात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्याने प्रती टन ६२६.५२ रुपये तर धाराशिव जिल्ह्यातील नॅचरल शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीजन प्रती टन ६३९.२२ रुपये खर्च कपात केली आहे. सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथआण्णा नाईकवाडी हुतात्मा किसन आहिर सहकारी साखर कारखान्याने प्रती टन ६५६.२८ रुपये खर्च कपात केली आहे. मागील वर्षी १०.२५ टक्के उतार्यासाठी प्रतिटन तीन हजार ५० रूपये एफआरपी निर्धारित करण्यात आला होता, अशी माहिती साखर आयुक्तालयातील अर्थ विभागाचे संचालक यशवंत गिरी दिली.