धुळे : जिल्ह्यातील उसाची तोडणी आणि खरेदी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, गुजरात व नंदुरबारातील कारखाने करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने बंद असून, त्यांची वाताहत झाली आहे. त्यातून शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उसाची खरेदी इतर ठिकाणाहून केली जात आहे. तर साक्रीतील पांझरा कान, शिरपूर येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना अनेक वर्षे बंद आहे. कामगारांची देणीही रखडली आहेत. दहीवद येथील कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी गेल्या वर्षी सभासदांनी विशेष सर्वसाधारण घेऊन बहुमताने मंजुरी दिली होती. परंतु या प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा कारखाना सुरू होऊ शकलेला नाही.
‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शिरपूर, साक्री व नजीकच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यासाठी शिरपूर शेतकरी सहकारी साखर महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा घेतली जावी, अशी मागणी ऊस उत्पादक करीत आहेत. पांझरा कान कारखाना भंगाराच्या स्थितीत आहे. त्यातील यंत्रांची चोरी झाली आहे. त्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे आरोप केले जातात. हे कारखाने चालू होऊ शकले तर रोजगार उपलब्धता होऊ शकते. या भागातील आदिवासी, कष्टकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. ऊस पिकासाठी मुबलक पाणी, सुपीक जमीन आदी कारखान्यांजवळ आहेत. वाहतूक खर्चही कमी लागतो. त्याचा विचार करून कारखाने सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.