मुंबई: पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीने महागाई भडकणार हे आता स्पष्ट झाले आहे. डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे वाहतूकदारांनी याचा बोजा आता ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. तर वाहतूकदारांसमोर पैशाची चणचण भासत असल्याची स्थिती आहे. आगामी काळात वाहतुकदारांकडून जुन्या दरावर माल वाहतूक करणे बंद केले जाईल अशी स्थिती आहे. डिझेलच्या दरात झालेल्या वाढीनंतर आता माल वाहतुकीच्या दरात वाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे वाहतूकदारांचे म्हणणे आहे.
बाजारातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, छोट्या वाहतूकदारांना महागड्या डिझेलच्या काळात बाजारात टिकून राहणेही मुश्किल होईल. सरकारी तेल कंपन्यांनी ऑक्टोबरच्या अखेरपासून देशातील सर्व ठिकाणी डिझेल, पेट्रोलची दरवाढ केली. ऑक्टोबरपासून पेट्रोलमध्ये प्रतिलिटर १० रुपये तर डिझेलमध्ये ११ रुपयांची वाढ करण्यात आली. शनिवारी मुंबईत डिझेलचा दर ८८.६० रुपये प्रती लिटरवर पोहोचला.
डिझेलच्या दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रात झाला आहे. दरवाढीमुळे माल वाहतूक करणारे ट्रक चालक आपले भाडे वाढवत आहेत. उद्योगांमध्ये जनरेटरचा वापर होतो. त्यासाठीचा खर्चही वाढला आहे. टेलिकॉम कंपन्या आपल्या टॉवरसाठी डिझेल जनरेटरचा वापर करतात. महागड्या डिझेलमुळे तो खर्चही वाढला आहे. या क्षेत्रातील अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वाहतूकदारांनी आपल्या भाडे दरात वाढ केली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात माल भाड्यात वाढ दिसून आली आहे. जानेवारी प्रमुख मार्गांवरील वाहतूक दरात ०.७५ ते ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली. मात्र, फेब्रुवरीत भाडे आणखी ६ ते ८ टक्के वाढले. पेट्रोल आणि डिझेलच्या उच्चांकी दरांमुळे महागाई वाढणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र, काही वाहतूकदारांना या व्यवसायात टिकणेही मुश्किल झाले आहे. त्यांचा व्यवसायाचे खर्च वाढतच चालले आहेत. परिणामी त्यांना व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे.