कोल्हापूर : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने झाले तरी हरळीतील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याला ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना अद्याप बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. चंदगड तालुक्यातील ओलम शुगर्स, दौलत अथर्व’ व इको-कोन या तीनही खासगी कारखान्यांसह आजरा सहकारी साखर कारखान्यानेही डिसेंबरअखेरची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत. मात्र, गडहिंग्लज कारखान्याने अद्याप एकाही पंधरवड्याचे बिल दिलेले नाही. २९ जानेवारीअखेर ७७,५९० मेट्रिक टन गाळप झाले असून, ९०,२७० पोती साखर उत्पादन झाले आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून चार डिसेंबर २०२३ रोजी कारखान्याचा गळीताचा प्रारंभ झाला. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे २२ डिसेंबरपासून गाळप सुरू झाले. तांत्रिक अडचणींवर मात करीत हंगाम यशस्वीतेसाठी कामगारांची धडपड सुरू आहे. मात्र, उसाची बिले न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, त्याचा परिणाम दैनंदिन गाळपावर होत आहे. दरम्यान कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, ऊस बिले भागविण्यासाठी कारखान्याने जिल्हा बँकेकडे ४० कोटींच्या साखर तारण कर्जाची मागणी केली आहे. त्यालाही मंजुरी मिळाली असून, १५ जानेवारी अखेरची बिले लवकरच अदा केली जातील.