नवी दिल्ली : प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने शीतपेयांच्या बाजारपेठेत कोका कोला आणि पेप्सिकोसारख्या ब्रँडशी स्पर्धा सुरू केली आहे. आपल्या व्यवसायाचा विस्तार करत असताना, रिलायन्सकडून कोला मार्केटचा प्रतिष्ठित ब्रँड कॅम्पा कोला या दिल्लीस्थीत प्युअर ड्रिंक ग्रुपसोबत सुमारे २२ कोटी रुपयांच्या डील अंतर्गत विकत घेतला आहे. रिलायन्सचे कोला ड्रिंक आता कोका-कोला आणि पेप्सिकोशी स्पर्धा करण्याच्या तयारीत असून रिटेल आउटलेटवरदेखील ते उपलब्ध आहे. आणि तेदेखील यूएसमधील प्रतिस्पर्धी ब्रँडच्या तुलनेत खूपच स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. रिलायन्स जिओ मार्ट कॅम्पा कोलाची २-लीटर बाटली ४९ रुपयांना विकत आहे, तर कोका-कोला १.७५-लीटरची बाटली ७० रुपयांना आणि पेप्सी २.२५-लीटरची बाटली ६६ रुपयांना विकत आहे.
आजतकमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे आता शीतपेयांच्या बाजारपेठेत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहेत. या क्षेत्रातील दिग्गज कोका-कोला आणि पेप्सी यांसारख्या कंपन्यांना मात देण्यासाठी त्यांच्या रिलायन्स समूहाने मोठी योजना आखली आहे. याअंतर्गत, त्यांनी प्रथम कॅम्पा कोला या ७० च्या दशकातील प्रसिद्ध ब्रँडचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे, त्याचवेळी त्यांनी गुजरातमधील शीतपेय फर्म सोस्यो हजुरीच्या भागभांडवल खरेदी करण्याची घोषणासुद्धा केली आहे.