मुंबई दि. २६: सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगले समन्वय ठेऊन काम करा तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ते आज आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत होते. या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे तसेच मुंबई पालिका आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे मात्र तरी देखील पाउस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाउस, ढग फुटी असे काहीही होऊ शकते, त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा.
ज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी दिला.
आपण आपत्तीत बचाव कार्य करणार आहोत पण सध्या कोविड परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स. मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
*गेल्या वर्षी प्रमाणे सांगली – कोल्हापूरला पुराची पुनरावृत्ती नको*
गेल्या वर्षी प्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.