कोल्हापूर : केंद्र सरकार व राज्य सरकारने महाराष्ट्रातील साखर उद्योगाला पाठबळ देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील साखर उद्योगाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन या उद्योगाला ऊर्जितावस्था आणली. साखर उद्योगाला भरावा लागणारा दहा हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन साखर कारखानदारीला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांनी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी शनिवारी रात्री त्यांची सदिच्छा भेट देऊन साखर उद्योगासंदर्भात चर्चा केली. त्यांनी साखर उद्योगातील विविध धोरणांवर सुमारे ४५ मिनिटे चर्चा केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुरुदत्त शुगर्स व घाटगे परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत चेअरमन माधवराव घाटगे व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी केले. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने साखर उद्योगासंदर्भात अनेक चांगले धोरणात्मक निर्णय घेऊन कारखानदारी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील इंधनावर होणाऱ्या परकीय चलनामध्ये बचत करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे, यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, महादेव घुमे, प्रसन्न घुमे, ओंकार निकम, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.