कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये दरवर्षी बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना या जिल्ह्यांतून हजारो ऊसतोड मजूर या कामाच्या निमित्ताने स्थलांतरित होतात. त्यांच्यासोबत लहान मुलेही येत असतात. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो. या बालकांना शिक्षणासाठी काम करणाऱ्या अवनि सामाजिक संस्थेने केलेल्या बालकांच्या सर्वेक्षणासंदर्भात अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडण्यात आला.
बीड जिल्ह्यातील १९१ गावांतील १९७९ कुटुंबे गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी आली. त्यांच्यासोबत ० ते १८ वयोगटातील १९०३ मुले होती. पालक ऊस तोडताना ही मुले उसाच्या फडात काम करताना आढळली. प्रशासनासोबत संवाद करूनदेखील त्यामध्ये काही बदल झाला नाही, असे ‘अवनि’ संस्थेच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले.
राज्य सरकारने ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शासनाने बीड, जालना या ठिकाणी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या अंतर्गत संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात आले आहे. तरीही अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याची बाब ऑगस्ट २०२३ मध्ये बीड या ठिकाणी अवनि सामाजिक संस्थेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडला. याचा संदर्भ घेत अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न मांडण्यात आला आहे. शासनाने बीडसह राज्यातील इतर जिल्ह्यांतील ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखावे अथवा त्याची कारणे सांगावीत, अशी मागणी तारांकित प्रश्नाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी दिली.