नवी दिल्ली/ सुवा : पंतप्रधान सितेवनी राबुका यांच्या अध्यक्षतेखालील फिजीच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खास करुन साखर कारखान्यांची देखभाल आणि व्यापक रेल्वे नेटवर्कच्या अपग्रेडेशनवरही चर्चा झाली.
फिजीचे साखर मंत्री चरण जित सिंह यांनी सांगितले की, त्यांनी रकीराकी कारखान्याचे पुनर्निर्माण आणि साखर उद्योगाशी संलग्न इतर अनेक मुद्यांवर जयशंकर यांच्याशी चर्चा केली आहे. ते म्हणाले की, त्यांनी फिजिमध्ये रेल्वे प्रणालीवरही चर्चा केली आहे. रेल्वे प्रणाली केवळ साखरेसाठी तयार असू नये. ऊस तोडणीच्या काळात आम्ही उसाच्या वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर करू शकतो. ते म्हणाले की, तोडणी हंगाम संपुष्टात आल्यानंतर आम्ही प्रवासी आणि कार्गोसाठी एकाच रेल्वेचा वापर करू शकतो. त्यामुळे आम्ही सर्व पर्याय पडताळून पाहू. जयशंकर यांनी सांगितले की, भारताने फिजीमध्ये ऊस उद्योगाचे आधुनिकीकरण आणि कामकाजात सहकार्य केले आहे. पुढेही सहकार्य सुरू राहिल.