नवी दिल्ली : सध्या देशातील डिस्टिलरींना इथेनॉल उत्पादनासाठी तुकडा तांदूळ आणि मका यासारख्या फीडस्टॉकच्या कमतरतेला तोंड द्यावे लागत आहे. तांदूळ उपलब्ध नसल्यामुळे डिस्टिलरीजना अडचणी येत आहेत. खुल्या बाजारात मका आणि तुटलेल्या तांदळाचे भाव जास्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार योग्य पर्याय शोधत आहे, असे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी सांगितले.
इंडिया टीव्हीने पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानसार, ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असे अन्न सचिवांनी म्हटले आहे. भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) गेल्या महिन्यात इथेनॉल उत्पादकांना त्यांच्या डेपोतून तांदूळ पुरवठा बंद केला होता. त्यामुळे उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जाते. २०२५ पर्यंत हे प्रमाण दुप्पट करण्याचे केंद्र सरकारचे टार्गेट आहे.
मात्र, इथेनॉल उत्पादनात अडचणी वाढल्या आहेत. साखर उद्योगाची शिखर संस्था ‘इस्मा’ने इथेनॉलच्या किमती वाढवण्याची मागणी केली आहे. याबाबत अन्न सचिव चोप्रा यांनी सांगितले की, एक समिती आधीच या विषयावर चर्चा करत आहे. इथेनॉल उत्पादन वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (डिसेंबर-नोव्हेंबर) सरकार इथेनॉलच्या किमती वाढवायच्या की नाही यावर निर्णय घेईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या इथेनॉल मिश्रण ११.७ टक्क्यांवर आहे. ते १२ टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे चोप्रा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बीसीएल इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक राजिंदर मित्तल यांनी मक्यापासून तसेच खराब धान्यापासून उत्पादित इथेनॉलच्या किंमतीत वाढ उद्योगासाठी फायदेशीर ठरेल, असे सांगितले. ते म्हणाले, अनेक आघाडीच्या उत्पादकांनी आधीच स्वस्त दरातील मका साठवून ठेवला आहे आणि ते सरकारचे धोरण येण्याची वाट पाहत होते. त्यांना इथेनॉल दरवाढीचा फायदा होईल. त्यांची उत्पादन क्षमता वाढली असून त्यांनी कमी किमतीत प्रचंड कच्चा माल खरेदी केला आहे, असे मित्तल यांनी सांगितले.