महाराष्ट्र आणि ब्राझीलमध्ये ऊस, सोयाबीन, कापूस संशोधन, व्यापारासंदर्भात चर्चा

मुंबई : ब्राझील सरकारमधील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ऊस, सोयाबीन आणि कापूस संशोधन, व्यापाराबाबत चर्चा करण्यात आली. ब्राझीलच्या शिष्टमंडळाने मंत्री धनंजय मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले. मंत्री मुंडे यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक शेती व त्यामध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांविषयी माहिती दिली. राज्याच्या प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोलाचे योगदान असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

यावेळी कमी पावसात उत्पादित होणारे सोयाबीन, त्यानुसार शेतीमध्ये केलेले प्रयोग याविषयी संशोधन तसेच बेदाणेची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझीलसोबत यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्यांविषयी चर्चा करण्यात आली. ब्राझीलच्या कृषी, व्यापार व गुंतवणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी व राजदूतांचा शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाने मुंडे यांना नोव्हेंबरमध्ये ब्राझील देशाचे निमंत्रण दिले. शिष्टमंडळात ब्राझील दूतावासाचे सचिव तथा व्यापार व गुंतवणूक विभागाचे प्रमुख वेगनर, भारतीय दुतावासातील राजदूत केनेथ नोब्रेगा, काऊन्सिल जनरल जोआओ मेंदोना, कृषी विभागाचे अँजिलो किरोज आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here