कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या आसवनी (डिस्टलरी) प्रकल्पाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या हस्ते गुरुवारी झाला. गेले अनेक दिवसांपासून ही डिस्टिलरी बंद होती. सात वर्षांपूर्वी संचालक मंडळाने हा प्रकल्प भाडेतत्त्वावर खासगी मालकाला चालविण्यासाठी दिला होता; मात्र तो काही दिवसांपासून बंद होता.
हा प्रकल्प कारखान्याच्या मागील संचालक मंडळाने ताब्यात घेतला. विद्यमान संचालक मंडळाने पुन्हा हा प्रकल्प कारखान्यामार्फत चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी या प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. संचालक अक्षयकुमार व अन्विता पवार – पाटील यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली. प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक ए. ए. पाटील, सहायक एन. एम. होडगे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.