सोलापूर : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या दिवशी आलेल्या उसाचे प्रति टन २७०० रुपयांनी ऊस बिल शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे देण्यात आले. तोडणी वाहतूकदारांना वाहतुकीच्या रकमेवर साठ टक्के कमिशनसह रक्कमेचे धनादेश देण्यात आले. शिवाय एक किलोमीटर ते पंधरा किलोमीटर अंतरावरील उसाला १५ किलोमीटरची वाहतूक देणे व १५ किलोमीटर ते ३० किलोमीटर अंतरातील ऊसाला तीस किलोमीटरची वाहतूक देणे हा निर्णय प्रशासन मंडळाने घेतल्यामुळे वाहतूकदारांचा फायदा होणार आहे.
प्रशासकीय संचालक महेश चिवटे, संजय गुटाळ, कार्यकारी संचालक बागनवर शेती खात्याचे प्रमुख विजय खटके, मंगेश मंगोडे, बप्पा वळेकर यांच्या उपस्थितीत धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी महेश चिवटे म्हणाले, हा कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे. अत्यंत अडचणीच्या काळात हा कारखाना सुरू होत आहे. कारखाना सभासदांनीच वाचवणे आता गरजेचे आहे. प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस द्यावा. येणाऱ्या उसाची व ऊस तोडणी वाहतूकदारांची रोख रक्कम देण्याचे नियोजन केले आहे, असे त्यांनी सांगितले.