कोल्हापूर : राज्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात गाळप हंगामाने वेग घेतला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश आणि रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटनांनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे गाळप खूप धीम्या गतीने सुरु आहे. राज्यात 13 नोव्हेंबरपर्यंत 103 साखर कारखान्यांकडून 35 लाख टन ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. तसेच 6.66 टक्के सरासरी उताऱ्यानुसार 23 लाख 43 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
साखर आयुक्तालयाकडे यंदाच्या 2023-24 च्या हंगामासाठी 217 साखर कारखान्यांनी गाळप हंगामास परवाना मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ऊसतोडणी महामंडळाच्या कपात रकमेसह एफआरपीची रक्कम आणि अन्य निधींची पूर्तता केलेल्या आणि छाननीमध्ये परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या साखर कारखान्यांनाच ऊस गाळप परवाने वितरित करण्यात आले आहेत. आयुक्तालयाने सोमवारअखेर 80 सहकारी आणि 92 खासगी मिळून एकूण 172 साखर कारखान्यांना यंदाचे ऊस गाळप परवाने ऑनलाईन वितरित केले आहेत.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळास 17 रुपये प्रतिटन या दराने द्यायची थकीत रक्कम चार टप्प्यात वसूल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. त्यामुळे कारखान्यांनी तातडीने ही रक्कम भरून ऊस गाळप परवाना मिळविण्याची लगबग केली आणि परवाने घेण्याचे प्रमाण वाढले. सध्या केवळ 45 कारखान्यांना परवाने देणे बाकी असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना दिली.