बेळगाव : केंद्र सरकारच्या धोरणामुळे आगामी काळात उसाला चांगला दर मिळणार आहे. हा दर किमान पाच हजारापर्यंत जाईल, असे मत माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी व्यक्त केले. वेदांत फाऊंडेशनतर्फे रविवारी महिला विद्यालयाच्या सभागृहात स्मार्ट शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात परिसरातील ३१ शेतकरी दाम्पत्यांना गौरवण्यात आले. शेतकरी अधिक नफा मिळवणाऱ्या पिकांना प्राधान्य देतात. परिणामी उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे कवटगीमठ यांनी सांगितले.
कवटगीमठ म्हणाले की, बेळगाव तालुक्यातील शेतकरी ऊस पीक अधिक प्रमाणात घेतो. परंतु, अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी कष्टाला नियोजन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. शेतीला नियोजनाची जोड मिळाल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. शेतीतज्ज्ञ जयवर्धन माने यांनी मार्गदर्शन केले. फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रास्ताविक केले. के. व्ही. पाटील यांनी अहवाल वाचन केले. विरेश किवडसण्णावर यांनी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ईश्वर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.