एफआरपी थकल्यामुळे जिल्हा बँक अडचणीत

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम न दिल्यानं आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आली आहे. जिल्हा बँकेला पीक कर्ज वसुलीमध्ये अडचणी येत असल्याचे दिसत आहे. वसुलीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची एकूण ८६ टक्के कर्ज वसुली झाली आहे. तर, उर्वरीत १४ टक्क्यांमध्ये अजूनही २६० कोटी रुपये शेतकऱ्यांकडे थकीत आहेत. या थकीत रकमेवर दंड व्याज भरावे लागणार असल्याने शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागणार आहे.

साखर कारखाने अडचणीत असल्यामुळं त्यांना एक रकमी एफआरपी देणे शक्य नव्हते. सभासद शेतकऱ्यांशी लेख करार करून कारखान्यांनी एफआरपीची फोड केली. शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता २३०० रुपये दिला. त्यानंतर काही कारखान्यांनी दुसरा हप्ता दिला. पण, साखरेला उठाव नसल्यामुळं बहुतांश साखर कारखान्यांकडे एफआरपीची उर्वरीत रक्कम देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांची बिले थकली आहेत. साखर कारखान्यांना उर्वरीत एफआरपी देता यावी, यासाठी सरकार अल्पमुदतीच्या कर्जाची सोय करत आहे. परंतु, ही प्रक्रिया अजूनही सुरूच असल्यामुळे अनेक कारखान्यांचा दुसरा हप्ता जमाच झालेला नाही. दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यात २ लाख ८० हजार शेतकऱ्यांना १ हजार ६९२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटले होते. सेवा संस्थांच्या माध्यमातून देण्यात आलेले हे कर्ज ऊस बिलातून याची वसुली करण्यात येते. त्यातून एक हजार ४३२ कोटी रुपये वसूल झाले आहेत. पण, उसाची बिलेच जमा न झाल्यामुळं जिल्हा बँकेचे २६० कोटी रुपये थकले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here