शामली : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून अद्याप ऊस बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्के ऊस बिले मिळाली आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे ७०० कोटी रुपये साखर कारखान्यांकडे अडकले आहेत. हंगाम संपून एक महिना उलटला आहे. तर तीन महिन्यानंतर नवा साखर हंगाम सुरू होईल. ऊस बिले न दिली गेल्याचा प्रश्न सरकारसाठीही कठीण बनला आहे.
याबाबत एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय किसान युनियनसह विविध शेतकरी संघटनांनी याप्रश्नी आंदोलने सुरू केली आहेत. शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत विचारविनिमय करण्याबाबत जिल्हाधिकारी जसजीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित या बैठकीत जिल्ह्यातील तिन्ही, शामली, थानाभवन आणि ऊन साखर कारखान्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नवा गळीत हंगाम पूर्ण होण्यापूर्वी ऊस बिले देण्याची सक्त ताकीद दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले न देणाऱ्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी तिन्ही कारखान्यांच्या प्रतिनिधींना पैसे देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्याचे निर्देश दिले. नवा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसे दिले जाणे आवश्यक आहे.