लोणी काळभोर : गौरी गणपती झाले. नवरात्रोत्सवही आता अखेरच्या टप्प्यात आहे. काहीच दिवसांवर दिवाळी येवून ठेपली आहे. सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले आहेत, पण थेउर ता. हवेली येथील यशवंत सहकारी साखर कारखाना बंद झालेला आहे. शिवाय चार ते पाच वर्षांपासूनचे कारखान्यांच्या कामागारांचे वेतनही रखडले असल्याने, या कामगारांची दिवाळी मात्र कडूच जाणार असल्याचे चित्र आहे. बंद पडलेला यशवंत कारखाना यावेळी सुरु होवून कामगारांना वेतन मिळेल अशी आशा होती, पण राजकारणाच्या धामधुमीत कामगारांच्या वेतनाचा प्रश्न आता अधिकच रखडला आहे.
कारखाना सुरु करण्यासंदर्भातली प्रक्रिया देखील रेंगाळली आहे. यामुळे कामगारांच्यात प्रचंड नाराजी आहे. साखर विक्रीतून कामागारांची देणी द्यावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. पण याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झालेली नाही. याबाबत कामगारांनी कुटुंबीयांसह मोर्चा, उपोषण आणि धरणे आंदोलनही केले आहे. पण तरीही कुठलाच निर्णय झालेला नाही. वेतन मिळत नसल्याने कारखान्याचे कामगार अतिशय हालाखीत आयुष्य जगत आहेत. दिवाळी तोंडावर असूनही त्यांच्या पदरी आर्थिक निराशाच आहे. याबाबत बोलताना राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, कामागरांच्या थकीत वेतनावर संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय मिळण्याची आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात कामगारांनी कामगार आयुक्तालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर आयुक्तांनी तत्कालीन जिल्हाधिकार्यांना महसूल वसुलीअंतर्गत यशवंत कडे शिल्लक असलेला साखर साठा जप्त करून सदर साखरेची लिलाव पद्धतीने विक्री करावी, असा आदेश दिला होता. या आदेशान्वये दि. 26 फेब्रुवारी 2012 रोजी 82092 क्वींटल साखर हवेलीचे तत्कालीन तहसीलदार संदेश शिर्के, तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक पाटील, तत्कालीन मंडलअधिकारी विद्याधर सातव यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. यामधून अबकारी कर वगळता सुमारे 20 कोटी रुपये उपलब्ध झाले होते. सदर रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार हवेली तहसिलदारांच्या नावे बँक खात्यात जमा करण्यात आली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन तहसिलदार शिर्के यांनी कारखान्याकडे कामगारांना देण्यासाठी 11 कोटी 5 लाख 44 हजार 925 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता, यातून कामगारांना काही रक्कम अदा करण्यात आली. परंतु, त्यानंतरही कामगारांचे काही वर्षांचे वेतन अद्यापही थकीतच असल्याने याबाबतचा पाठपुरावा कामगारांच्या मार्फत केला जात आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.