नेवासे तालुक्यातील शेतकर्‍यांची दिवाळी यंदा गोड

नेवासे : साखर उद्योगाला अनेक अचडणींना सामोरे जावे लागत आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखर साठवणुकीचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. विक्री अभावी साखर पडून आहे. यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी ऊस शेतकर्‍यांची देणी भागवण्यात कारखाने अपयशी ठरलेले आहेत. असे असतानाही नेवासे तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखान्याने मागील 2018-19 या गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाचे पूर्ण पेमेंट, परतीच्या ठेवी, व्याज, कामगारांचा बोनस व पगार असे तब्बल 30 कोटी रुपये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. यामुळे नेवासे तालुक्यातील शेतकर्‍यांची यंदाची दिवाळी निश्‍चितच गोड होणार आहे.

मुळा कारखान्यामार्फत इतर कारखान्यांना देण्यात आलेल्या ऊसाचे पेमेंटदेखील यामध्ये समाविष्ट केले आहे. बाजारपेठेत हा पैसा येणार असल्याने शेतकर्‍यांसह व्यापारी वर्गाला याचा फायदा होणार आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.बी. ठोंंबरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बँकेत वर्ग करण्यात आलेले पैसे लवकरच संबंधितांना त्यांच्या बँक खात्यातून उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या धोरणानुसार मुळा कारखान्याचा एफआरपी प्रमाणे दर तोडणी व वाहतूक वजा जाता प्रतिटन 2353 रुपये निघत होंता. ऊस किंमत नियामक मंडळाच्या सूत्रानुसार कारखान्याने 16 सप्ेटंबर 19 रोजी झालेल्या वार्षिक सभेत ऊसाचा अंतिम दर प्रतिटन 2503 रुपयांप्रमाणे जाहीर केला होता. त्यातून पूर्वीची दिलेली रक्कम वजा जाता राहिलेले पेमेंट प्रतिटन 150 रुपयांप्रमाणे होणारी रक्कम सोमवारी संबंधित ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याने 18 हजार 621 शेतकर्‍यांना या माध्यमातून जवळपास 18 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

यंदा पाण्याअभावी ऊसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. शेतात ऊस वाळल्याने दर हेक्टरी 5 ते 7 टन ऊसाचे वजन घटले. त्याचा शेतकर्‍यांना 25 कोटींचा फटका बसला. त्यात हुमणीचीही भर पडली. तालुक्यात जवळपास 5 हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र हुमणीचा प्रादूर्भाव वाढल्याने धोक्यात आले. उन्हाळ्यात पाण्याअभावी आणखी नुकसान होवू नये, म्हणून संगमनेर, कुकडी व पराग या तीन कारखान्यांना 1 लाख 33 हजार टन ऊस देण्याचा निर्णय घेतला. बाजारात साखरेची मंदी असतानाही एफआरपीपेक्षा 150 रुपये जादा दराचा निर्णय घेवून शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न केल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.

दहा वर्षांपूर्वी वीज प्रकल्पाचा पहिला टप्पा उभारणीसाठी ऊस पेमेंटमधून टनामागे 50 रुपयांची ठेव कपात केली. या प्रकल्पाची कर्जफेड यापूर्वीच झाली असून, आता ही कपात केलेली ठेव परतीच्या वेळापत्रकानुसार चालू वर्षी देय होत असल्याने जवळपास 4 कोटीची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.  सध्याच्या साखर उद्योगाच्या अडचणीच्या काळातही मुळा कारखान्याने त्यांचे साखर युनिट, डिस्टिलरी आणि वीजप्रकल्प चांगल्या पद्धतीने चालवले, योग्य आर्थिक नियोजन केले. त्यामुळे शेतकर्‍यांनाही त्यांच्या ऊसाचा योग्य मोबदला देता आल्याचे सांगून सभासद ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी मिळून जवळपास 30 कोटीचे पेमेंट बँकेत वर्ग करण्यात आले आहे. यामुळे यंदा शेतकर्‍यांची दिवाळी जोरात होणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here