अहमदनगर : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी केंद्र सरकारने धोरण बदलून साखर निर्यातीला परवानगी द्यावी, त्याचबरोबर साखरेची आधारभूत किंमत वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.
अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी सभासद शेतकऱ्यांच्या ठेवीवरील व्याज १० ऑक्टोबरला बँक खात्यात वर्ग केले जाईल. कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देऊ अशी घोषणा केली. यावेळी जिल्हा बँक व कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्येष्ठ संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, जि.प. माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, संचालिका रत्नमाला नवले, लताताई मिसाळ, ‘मुळा’चे संचालक भाऊसाहेब मोटे, आबासाहेब पांढरे, दिलीपराव लांडे, प्रभाकर कोलते, काशीनाथ नवले, भैय्यासाहेब देशमुख, रामदास गोल्हार, शेतकरी संघटनेचे अंबादास कोरडे, रामराव भदगले आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
नरेंद्र घुले म्हणाले, केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात आले आहे. केंद्र सरकारने धोरण बदलून साखर निर्यातीला परवानगी दिली आणि साखरेची आधारभूत किंमत वाढवून दिली तर त्याचा साखर उद्योगाला फायदा होईल. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, संचालक काकासाहेब नरवडे, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, अंकुश काळे, रामराव भदगले, अंबादास कोरडे, दिनकर गर्जे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक अॅड. देसाई देशमुख यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी नोटीस वाचन केले. गणेश गव्हाणे यांनी आभार मानले.