डोईवाला : साफसफाईच्या कामासाठी डोईवाला साखर कारखाना पाच तासांसाठी बंद ठेवण्यात आला. साखर कारखाना बंद राहिल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.
डोईवाला साखर कारखान्यात सफाईचे काम करण्यात येणार असल्याने त्याची तयारी करण्यात आली. कारखान्यातील पॅनची सफाई करण्यात आल्याने सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत गाळप बंद राहिले. त्यामुळे वजन करून होणारी ऊस खरेदीही बंद करण्यात आली. परिणामी साखर कारखान्याबाहेर ऊस घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या. कारखाना बंद राहिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ झाली.
कारखाना प्रशासन वारंवार विविध कारणांनी गाळप बंद करीत असल्याने अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जर कारखाना दुरुस्ती अथवा सफाईसाठी बंद केला जाणार असेल तर त्याची शेतकऱ्यांना आधी माहीती दिली जावी अशी मागणी करण्यात आली. कारखान्याचे मुख्य इंजिनीअर आर. के. शर्मा यांनी सांगितले की, पॅनची दुरुस्ती अत्यंत तातडीची होती. त्यामुळे गाळप पाच तास बंद ठेवावे लागले. सायंकाळी चार वाजता गाळप पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.