ऋषिकेश : डोईवाला साखर कारखान्यामध्ये रिव्हर्स बगॅस करिअर (आरबीसी) तुटल्याने सोळा तास उत्पादन ठप्प झाले. आरबीसी तुटल्याने कारखाना बंद करण्यात आल्यामुळे ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. याप्रकरणी बेफिकीरी केल्याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर सहायक अभियंता आणि बॉयलर इन्चार्जविरोधात आरोप दाखल करण्यात आले आहेत.
गुरुवारी रात्री उशीरा एकच्या सुमारास, कारखान्यात रिव्हर्स बगॅस करिअर तुटला. त्यामुळे कारखाना बंद पडला. शुक्रवारी दिवसभर कारखान्यातील गाळप ठप्प झाले. कारखाना सोळा तासांहून अधिक काळ बंद राहीला. त्यामुळे उसाचे गाळप झाले नाही.
ऊस परिषदेचे संचालक विमल प्रकाश यांनी सांगितले की, साखर कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिलेली नाही. कारखाना कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे. कारखान्याचे ऊस व्यवस्थापक पी. के. पांडे यांनी सांगितले की, अचानक बगॅस घेऊन येणारी क्रेन तुटल्याने कारखाना बंद करावा लागला. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्पादन पुन्हा सुरू करण्यात आले.
दुसरीकडे डोईवाला साखर कारखान्यातील आरबीसी तुटण्याच्या प्रकाराबाबत कारखाना प्रशासनाने आरबीसी ऑपरेटर रामदेव, फायरमॅन प्रेम सिंह पुंडीर, बॉयलर लेबर जसविंदर सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. तर सहायक अभियंता हरिश्चंद्र सिन्हा, बॉलयर इन्चार्ज अमरपाल यांच्यावर या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कार्यकारी संचालक मनमोहन सिंह रावत यांनी सांगितले की या प्रकाराला जबाबदार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. जे शेतकरी ऊस घेऊन कारखान्यावर आले होते, त्यांचा ऊस २४ तासात वजन करून घेण्यात आला. आता मर्यादीत स्वरुपात गाळप सुरू करण्यात आले आहे. नंतर यामध्ये वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, डोईवाला साखर कारखान्यात वारंवार अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नादुरुस्त झाल्याने अनेकदा कारखाना बंद पडतो. त्यामुळे गाळप बंद होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहेत