बांगलादेशमध्ये स्थानिक रिफायनरींनी देशांतर्गत उद्योगाला अडचणीतून मुक्त करण्यासाठी भारतामधून होणारी साखर तस्करी रोखण्यासाठी तत्काळ कारवाईची मागणी केली आहे, असे वृत्त बांगलादेशातील प्रसार माध्यमांनी दिले आहे. जर अशा प्रकारे तस्करी केलेली साखर बाजारात येत राहिली तर देशातील साखर उद्योग संकटात सापडू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशनचे महासचिव गोलाम रहमान यांनी अलिकडेच वाणिज्य मंत्रालयाला पत्र पाठवून अवैध रुपात भारतातून येणाऱ्या साखरेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, साखर गेल्या तीन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात आणली जात आहे. त्यामुळे सरकारला महसुलाचे मोठे नुकसान सोसावे लागत आहे, असे रहमान यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, सीमावर्ती भागातून साखरेची तस्करी केली जात आहे. यामध्ये मैमनसिंहच्या अंतर्गत हलुआघाट, डोबाओवारा, नेत्रकोनामधील दुर्गापुर आणि कलमाकांडा, ब्राह्मणबरिया, सिलहट या विभागाचा समावेश आहे.
एका वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय साखरेची वाढती मागणी आणि स्थानिक बाजारातील वस्तूंच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ हे भारताहून होणाऱ्या तस्करीत वाढीचे कारण आहे.
भारताच्या Border Security Forcesने अलिकडेच बांगलादेशला तस्करी करून नेली जाणारी साखर जप्त केली होती. अवैध निर्यातीवर नियंत्रण आणले जाईल, असे भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
अलिकडेच मिंटमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर तस्करी रोखण्यासाठी सरकारने BSF सोबत चर्चा सुरू केली होती.
सद्यस्थितीत भारताने साखर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत.