ऑगस्टचा कोटा जाहीर; साखरेच्या दरांत तेजी

नवी दिल्ली : केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने देशांतर्गत बाजारपेठेसाठी ऑगस्ट महिन्याचा कोटा जाहीर केला आहे. जुलैच्या तुलनेत हा कोटा दीड लाख टनाने कमी करण्यात आला आहे. त्यामुळे याचा परिणाम साखरेच्या दरावर झाला असून, साखरेचा दर प्रति क्विंटल ५० रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे. सरकारने ऑगस्टचा कोटा जाहीर केल्यानंतर साखरेच्या दरांमध्ये तेजी दिसत आहे. ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे भारतात सणवार सुरू होता. श्रावण महिना आणि त्यानंतर भाद्रपद महिन्यात येणारा गणेशोत्सव, पाठापोठा बंगालमध्ये नवरात्रोत्सव येत आहे. तर, दुसरीकडे अतिरिक्त उत्पादन झालेले साखर कारखाने साखर विकायची कोठे या चिंतेत आहेत.

ऑगस्टचा देशांतर्गत विक्री कोटा जाहीर झाल्यानंतर मात्र साखरेच्या दरात तेजी दिसू लागली आहे. देशभरात साखरेचे दर प्रति क्विंटल ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. हे साखर उद्योगाच्या दृष्टीने चांगले संकेत असून, प्रति क्विंटल आणखी २५ ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाजारातील या परिस्थितीमुळे आता महाराष्ट्रातील साखर कारखानदार प्रति क्विंटल ३१०० रुपये दराने साखर विक्री करू शकतात. सध्या देशातील साखर कारखान्यांची अवस्था बिकट असून, त्यांच्याकडे कॅश फ्लो कमी आहे. आर्थिक अडचणीत असलेले साखर कारखाने या संधीचा लाभ उठवून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रयत्नात आहेत.

देशातील साखरेच्या मागणी-पुरवठ्याचे सूत्र सांभाळण्यासाठी केंद्र सरकार मासिक विक्री कोटा जाहीर करत आहे. गेल्या वर्षीपासून सरकारने कोटा पद्धत सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने साखरेच्या बफर स्टॉकची मर्यादा ४० लाख टन केली आहे. त्याचाही साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. मागणी-पुरवठा समतोल राहून, साखरेच्या किमती स्थिर ठेवणे आणि कारखान्यातील कॅश फ्लो वाढवण्यासाठी बफर स्टॉकचा निर्णयही फायदेशीर ठरणार आहे. सध्याच्या सकारात्मक परिस्थिती सरकारने आणखी एक आश्वासक पाऊल पुढे टाकावे आणि आपले निर्यात धोरण जाहीर करावे, अशी अपेक्षा साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. सणाच्या काळातील साखरेची मागणी आणि विदेशातील मागणी यामुळे साखर उद्योगाला संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here