कोल्हापूर : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्सची टांगती तलवार दूर केली आहे. आता एफआरपीपेक्षा जादा दिलेला दर इन्कम टॅक्समधून कमी करावा, अशी मागणी शहा यांच्याकडे करणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. येथे जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, ‘साखर कारखान्यांनी कर्ज काढून उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊ नये. आर्थिक शिस्त पाळावी, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
गेल्या वीस वर्षापासून एफआरपी देताना साखर कारखानदारांना इन्कमटॅक्सची टांगती तलवार होती. देशातील सर्वच कारखान्यांना हा प्रश्न भेडसावत होता. साखर कारखान्यांकडून घेतला जाणारा कर रद्द व्हावा, यासाठी वीस वर्षांपासून आम्ही लढा दिला. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी कारखान्यांच्या डोक्यावर असणारी टांगती तलवार काढून टाकली आहे.