कोल्हापूर : साखर कारखानदारांचा इथेनॉलमुळे फायदा होत आहे. इथेनॉलचे एक टक्के वाढीव धरले तर १६१ रुपये प्रतिटन वाढतात. हा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. तरीही तो कारखानदार त्यांना देत नाहीत. आम्हाला फायदा होणार नसेल तर इथेनॉलसाठी आमची साखर वापरायची नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली. मागील हंगामातील गाळप केलेल्या उसाला चारशे रुपयांचा दुसरा हप्ता दिल्याशिवाय यंदा उसाचे कांडे तोडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
कोडोली येथील छत्रपती चौकात आक्रोश पदयात्रेच्या सभेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार घालून सभेस सुरुवात करण्यात आली. राजू शेट्टी म्हणाले की, आमचा लढा साखर कारखान्यांत सुरू असलेल्या खाबुगिरीविरोधात आहे. गेल्या वर्षभरात देशांतर्गत बाजारपेठेत साडेसहाशे रुपये साखरेच्या दारात वाढ झाली आहे हे साधे गणित धरूनच आम्ही गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपयांची मागणी केली आहे. साखरेला जागतिक पातळीवर चांगला दर मिळत असताना केंद्र सरकारने साखर आयातीवर बंदी घातल्याने साखरेला चांगला दर मिळाला नाही. यासाठी साखर संघाने व साखर कारखानदारांनी आवाज उठवायला पाहिजे होता तो त्यांनी का उठवला नाही?
‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी ७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या २२ व्या ऊस परिषदेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. आक्रोश पदयात्रा मंगळवारी रात्री वारणा साखर कारखान्यावर पोहोचली. शेतकरी भवन समोरील छत्रपती शिवाजी महाराज व सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या पुतळ्याला शेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी कारखाना संचालकांना निवेदन दिले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, पन्हाळा तालुकाध्यक्ष अजित पाटील, अशोक पाटील, रामराव पाटील आनंदा शेळके यांच्यासह नागरिक उपस्थित होते. अमर पाटील यांनी आभार मानले.