अहमदनगर : येथील डॉ. बा. बा. तनपुरे सह साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला देण्यासाठी सुरू झालेल्या प्रक्रियेत एकच निविदा आली. आजच्या बैठकीत पुणे येथील उद्योगपती श्रीयुत दुग्गड अँड कंपनी यांची केवळ एकच निविदा आल्याने जिल्हा बँकेने शुक्रवारी जिल्हा बँकेच्या बैठकीत विषय क्रमांक १९ रद्द केला. यामुळे तालुक्यातील शेतकरी सभासद व कामगार संघटनांच्या मध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ निवडणूक लावावी, असा सूर सभासदांचा आहे. कारखाना २५ वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप सभासद करीत आहेत.
साखर कारखाना शेतकरी व कामगार संघटनांच्या मालकीचा रहावा, यासाठी कारखाना बचाव कृती समितीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ निवडणूक घेऊन कारखाना सभासदांच्या प्रतिनिधींना चालविण्यास द्यावा, अशी मागणी होत आहे. बचाव कृती समितीचे अमृत धुमाळ, अरुण पा. कडू, पंढरीनाथ पवार, राजुभाऊ शेटे, संजय पोटे, दिलीप इंगळे, कोंडा पा. विटनोर, सुखदेव मुसमाडे, भगवान गडाख, अप्पासाहेब दूस, सुभाष करपे, भारत पेरणे आदींनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्यासह उपाध्यक्ष, सदस्य, अधिकाऱ्यांचे आभार मानले.