धाराशिव : तीन कोटी रुपये एवढ्याच रक्कमेतून सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याची आता ३०० कोटी रुपयांवर संपत्ती झाली आहे. अवर्षण काळात पाण्याची गरज भासल्याने कारखान्याने प्रत्येकी तीन कोटींची दोन मोठी शेततळी निर्माण केली. एखाद्या वर्षी कमी पाणी असताना ऊस तुटून गेल्यावर फक्त पावसाच्या पाण्यावर ऊस जगवला. शेतकऱ्यांनी उसाची अन्यत्र विल्हेवाट न करता आपल्याच कारखान्याला ऊस दिला तर हा सहकारी कारखाना टिकेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक अरविंद गोरे यांनी केले. केशेगाव येथे कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. यंदा कारखाना ५ लाख मे. टन ऊस गाळप करणार असल्याचे सांगण्यात आले.
कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी राजर्षी शाहू ट्रस्टचे तज्ज्ञ विश्वस्त चंद्रकांत माळी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक-नारीकर यांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. विधीवत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून, गव्हाण पूजन करून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी चित्रांव गोरे म्हणाले की, यंदाच्या हंगामासाठी आठ हजार ५०० हेक्टर उसाची नोंद झाली असून, पाच लाख टन ऊस उपलब्ध होत आहे. यंदा शंभर बैलगाडी, १५० मिनी, ६५ मोठी वाहने, ३० हार्वेस्टर अशी भक्कम यंत्रणा कारखान्याकडे उपलब्ध आहे. कोसी ६७१ व एमएस १०००१ या ऊसजातीची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करावी, जेणेकरून उसाला अधिकचा दर देता येईल. संचालक फत्तेसिंह देशमुख, नीलेश पाटील, कुंद पाटील, शंकर सुरवसे, नामदेव पाटील, वर्षा पाटील, अश्विनी पाटील आदींसह सभासद, शेतकरी उपस्थित होते. संचालक आयुबखाँ पठाण यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विलास भुसारे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.