पुणे : राज्याचे १७ वे साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (६ जून) सूत्रे स्वीकारली. यापूर्वी डॉ. पुलकुंडवार यांनी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून अगदी सक्षमपणे जबाबदारी सांभाळली आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड हे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे १ जूनला साखर आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता.राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव (लेखा) नितीन गद्रे यांनी २ जून २०२३ रोजी डॉ.पुलकुंडवार यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. डॉ. पुलकुंडवार यांनी साखर आयुक्तालयात पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे साखर संचालक (अर्थ) यशवंत गिरी, सहसंचालक (उपपदार्थ) संतोष पाटील, राजेश सुरवसे यांनी स्वागत केले.
डॉ. पुलकुंडवार यांनी याअगोदर रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक म्हणून काम केले आहे. समृध्दी महामार्गांसाठीची भूसंपादन प्रक्रिया त्यांनी मोठ्या कौशल्याने हातळली. ते २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी, पुनर्विकास अधिकारी म्हणून, मेळघाट येथे उपविभागीय अधिकारी, कृष्णा खोरे प्रकल्पात विशेष भूसंपादन अधिकारी, नांदेडमध्ये निवासी जिल्हाधिकारी, परभणीत उपविभागीय अधिकारी, अंधेरीत एमआयडीसीचे उपमहाव्यवस्थापक म्हणून काम बघितले. २००८ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे खासगी सचिव म्हणून, त्यानंतर तत्कालीन आरोग्य मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिले. प्रशासनाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.