सातारा : शेतकऱ्यांनी भरघोस ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचनाच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन आणि व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. कमी पाण्यात जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता कायम ठेवत अधिकाधिक शाश्वत उत्पादन मिळवणे हा पाणी नियोजन, व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले. कळंभे (जि. सातारा) येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित ऊस उत्पादकता वाढ व ठिबक सिंचनाचे फायदे अंतर्गत मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या.
जिल्हा कृषी अधिकारी फरांदे म्हणाल्या की, ऊस उत्पादन घटण्यामागे उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य हे प्रमुख कारण आहे. उसाचे पीक शेतामध्ये १५ ते १८ महिने उभे असते. वाढीच्या काळात ऊस पिकास सतत बदलत्या हवामानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी नेटाफिम इरिगेशनचे अरुण देशमुख, आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर, वाईचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, ‘नेटाफेम’चे जिल्हा व्यवस्थापक केदार मुळे आदींनी ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचन फायदे यावर मार्गदर्शन केले. सरपंच सारिका गायकवाड, ज्योती गायकवाड, विश्वनाथ शिवतरे आदी उपस्थित होते.