बीड : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ११ साखर कारखान्यांवर ऊसतोडणी काम करणाऱ्या पालकांसोबत बीड जिल्ह्यातील शू्न्य ते १८ वयोगटातील १८३९ मुले आढळली होती. तेथील स्थानिक अवनि या संस्थेने याचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर बीडचा शिक्षण विभाग, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे आणि जागर प्रतिष्ठानचे अशोक तांगडे यांनी बीडमध्ये काही शाळांची तपासणी केल्यावर ही मुले बीडमधील शाळेच्या हजेरीपटावर उपस्थित असल्याचे उघड झाले होते. हजेरी पटावरील या गोंधळाची मानवी हक्क आयोगाने दखल घेत सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. त्याची आता सुनावणी सुरू आहे.
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अवनी संस्थेने पाठविलेल्या यादीची उलट तपासणी केली. तीन शाळांना भेटी दिल्यावर ही मुले कोल्हापूरमध्ये असतानाही त्यांची हजेरी बीडमध्ये असल्याचे दिसले होते. यासंदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा केली. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. आता याचिका दाखल झाल्याने कारवाई होईल अशी आशा असल्यानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे तत्त्वशील कांबळे यांनी सांगितले. मानवी हक्क आयोगासमोर याचिकेची ३१ जुलै रोजी एक सुनावणी झाली आहे. आता २६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यात अवनि संस्थेला बोलावण्यात आले आहे. याचिकेमध्ये प्रधान सचिव शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.